झगडा प्रत्येकीचा सुरु आहे, चांगल्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी, घर संसार सावरण्यासाठी, रोजच्या गर्दीतून माग काढत कामावर रुजू होणारी ‘ती’ देखील लढतेच आहे. मात्र, असे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडताना, आपल्यातील सामाजिक जाणिवा जिंवत ठेवण्याचे आवाहन करतेय ‘नीरजा’! नीरजा भनोत!
आकर्षक व्यक्तिमत्त्वाला आत्मविश्वासाची जोड देत वयाच्या १६व्या वर्षापासून तिने जाहिरातींत काम करण्यास सुरुवात केली. दूरदर्शन किंवा वर्तमानपत्रातील जाहिरातींतून नीरजाचा चेहरा लोकापर्यंत पोहोचू लागला. आणि त्याचसोबत, निराळे करिअर क्षेत्र निवडत पॅन ऍम कंपनीतून तिने विमान परिचारिका म्हणजेच, एअर हॉस्टेसचे प्रशिक्षण घेतले. आवडीचे काम, कामातून मिळणारा आनंद अनुभवताना तिच्या कामावरील निष्ठेचीच परिक्षा घेणारा एक प्रसंग तिच्यासमोर उभा ठाकला आणि तिही न डगमगता त्याला सामोरी गेली.
घडले असे, की ५ सप्टें. १९८६ रोजी ‘पॅन ऍम ७३’ हे मुंबईहून निघालेले विमान चार शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हायजॅक करुन, ते कराची विमानतळावर उतरवेले. त्याच विमानात वरिष्ठ परिचारिका म्हणून कार्यरत असणा-या नीरजाने विमानचालक व इंजिनिअर्सना विमानातून पळून जाण्यास मदत केली. त्यानंतर, अपहरणकर्ते ओळखपत्रे पाहून अमेरीकन नागरीकांना ठार करु लागताच. नीरजाने गोळ्या केलेल्या ओळखपत्रांतून १९ अमेरीकन नागरिकांचे पासपोर्ट लपवले. जेवण देण्याचे निमित्त करत, आपत्कालीन दरवाज्याबद्दल माहिती देणारी पत्रके तिने प्रवाशांपर्यंत पोहोचवली आणि विमानातील अंधाराचा फायदा घेत तिने आप्तकालीन दरवाजे उघडले व प्रवाशांना बाहेर पळून जाण्यास मदत केली, मात्र शेवटचा प्रवासी निघेपर्यंत स्वत: मागे राहिली. अखेर, अपहरणकर्त्याचा गोळीबार स्वत:वर झेलत, तिने मागे राहिलेल्या तीन लहान मुलांनाही वाचवले. तब्बल १७ तास झुंज देत, सुमारे ४०० प्रवासांचा जीव वाचवणा-या २२ वर्षीय नीरजाच्या असमान्य शौर्याची गोष्ट केवळ अद्वितीय!
भारताने नीरजा भानोत या वीर कन्येस, अशोकचक्र हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. तसेच, हा पुरस्कार मिळवणारी ती सर्वांत तरुण व्यक्ती आहे. रमा व हरिश भनोत यांची कन्या, भारताची वीरकन्या म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘नीरजा’ या चित्रपटाद्वारे तिची साहसकथा चित्रबद्ध देखील करण्यात आली. आपत्कालीन दरवाजा उघडताच, ती स्वत:चा जीव वाचवत, पळू शकली असती. ते जरा सोप्पं होतं, पण तिने कठिण मार्ग निवडला आणि तो मार्ग निवडण्यासाठी नीरजा भनोतचंच बेडर काळीज हवं!