Short and Crisp : अनुकूल

18 Jun 2020 10:00:00

ही कथा खूपच वेगळी कथा आहे. आणि म्हणूनच आज आपण या लघुपटाची निवड केली आहे. ही मूळ कथा सत्यजीत रे यांची आहे. सत्यजीत रेंच्या कथा तशा नेहमीच खूप रोचक असतात. त्यांचा फेलुदा वाचताना जे काही रहस्य निर्माण होतं, जी मजा येते, तीच मजा आजच्या या लघुपटात आहे. की कथा फिरते "अनुकूल" या रोबोटच्या भवती. कलकत्ता येथील निकुंज हा माणूस एकटाच राहत असतो, त्याच्या मदतीसाठी एका रोबोट एजेंसीमधून तो एक अगदी हुबेहूब माणसासारखा दिसणारा, वागणारा रोबोट आणतो ज्याचं नाव असतं, "अनुकूल".


quatation_1  H


रोबोट एजंसी सुरुवातीलाच अनुकूल बद्दल खूप काही निकुंज बाबूंना सांगते. आणखी एक महत्वाची बाब देखील सांगते. ते न पाळल्यास मोठा धोका निर्माण होवू शकतो असं देखील सांगण्यात येतं. एकेदिवशी निकुंज बाबूंच्या घरी त्यांचा भाऊ रतन येतो, त्याला केवळ रोबोटमुळे नोकरीवरून काढून टाकण्यात येतं. आणि त्यामुळे त्याचा रोबोटवर राग असतो. निकुंज बाबूंनी सांगितल्यानंतर त्याचा सर्व राग "अनुकूल"वर निघतो. आणि इथेच या गोष्टीला कलाटणी मिळते.



अनुकूल वर झालेल्या या हल्ल्यामुळे प्रेक्षकांना त्याच्या बद्दल एक महत्वाची बाब कळते. पुढील एका दृश्यात निकुंज बाबू अनुकूलला गीता समजावून सांगत असतात, हे दृश्य देखील खूप रोचक आणि कथेच्या दृष्टीने सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तसेच पुढे निकुंज बाबूंची नोकरी पण जाते, कारण पुन्हा एकदा रोबोट. त्याच दिवशी रतन पुन्हा एकदा घरी येतो, एक महत्वाची बातमी घेवून. आणि पुढे काहीतरी भयानक घडतं. काय घडतं? अनुकूलला काही होतं का? का इतर कुणाच्या जीवाला धोका निर्माण होतो? नेमकं काय घडतं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट.



या लघुपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत प्रसिद्ध अभिनेते सौरभ शुक्ला आणि बंगाली सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते तसेच 'कहानी' फेम परंबात्रा चॅटर्जी यांनी. तर याचे दिग्दर्शन केले आहे प्रसिद्ध दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी. हिंदी आणि बंगला या दोन्ही भाषांमध्ये हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. खूपच रोचक असा हा ळगुपट असल्या कारणाने आतापर्यंत या लघुपटाला यूट्यूबवर 40 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. त्यामुळे जर तुम्ही रहस्य कथांचे किंवा 'थ्रिलिंग' सिनेमांचे फॅन असाल तर हा लघुपट नक्कीच बघा.


Powered By Sangraha 9.0