Short and Crisp : २ कटिंग

06 May 2020 15:34:26

- निहारिका पोळ सर्वटे

कधी कधी काही लघुपट नकळत पण एक छाप सोडतात मनावर, तसाच काहीसा हा लघुपट. कटिंग म्हटलं की कॉलेज जवळची टपरी आठवते आणि मित्रांसोबत मारलेल्या अखंड गप्पा. मात्र या २ कटिंग ची कथा वेगळी आहे. ही गोष्ट आहे कुणाल आणि अन्विताची. कुणाल एक पेंटर आहे, आर्टिस्ट आहे. आणि त्याला पेंटिंग ही फक्त एक ‘हॉबी’ म्हणून न ठेवता त्याच्याचत करिअर करायचं आहे. ही फील्ड काही स्टेबल नाही आणि कुणाल खूप महत्वाकांक्षीही नाही. मात्र त्याच्या वडीलांचा आग्रह असतो कि त्यानी लग्न करावं. चार जबाबदाऱ्या पडल्या कि तो देखील पैसा कमावण्याबाबत थोडा सीरिअस होईल, असं त्याच्या वडीलांचं मत असतं आणि त्या मतानुसारच ते कुणालसाठी अन्विताला शोधून आणतात, आणि कुणाल राहतो तिथे त्यांची भेट होते. आई वडील एका गावात आणि कुणाल अन्विता दुसऱ्या गावात असे हे दृश्य. कुणालला मात्र हे टिपिकल लग्न प्रकार नको असतो, कारण त्याच्या मते मुलींना सेटल्ड मुलं हवी असतात आणि तो त्यातला नाही, त्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर पडू नये म्हणून तो जरा नाखुशीनेच अन्विताला भेटतो. 


don cutting_1  


कुणाल अन्विताची पहिली भेटच खूप मजेदार आहे. त्यांच्यातील संवाद, अन्विताचं बिंधास्त होऊन बोलणं, आणि कुणालची चिडचिड सगळंच मजेशीर आहे एकूण. कुणाल सतत तिला म्हणत असतो कि तू नकार देऊन टाक, तुझा निर्णय पटकन सांगून टाक, मात्र ती वारंवार आणखी एकदा भेटून एक मेकांना जाणून घेऊ मग ठरवू अशा विचारांची असते. आणि त्यानुसार चहाच्या टपरीवर त्यांच्या भेटी होतातही. अन्विता कुणालच्या पेंटिग्स बघायला येते. एकूणच दोघांच्या संवादातून दोघे एकमेकांपेक्षा खूप वेगळे असल्याचे भासते. 

एकूणच कुणाल आणि अन्विता या दोन विरुद्ध टोकाच्या लोकांचं आपसात लग्न होऊ शकत नाही, अशा निश्कर्षावर आपण पोहोचतो, आणि मग या लघुपटाचा शेवट येतो जो खूपच सुंदर आहे. अन्विताचा मोनोलॉग ऐकण्यासारखा आहे, कारण आताच्या काळात अशा विचारांच्या मुली मिळणे म्हणजे एक स्वप्नच असे म्हणता येईल. एकूणच एक चांगला संदेश हा लघुपट देतो. 



अनेकदा कसं होतं, आपण लग्न, स्पेशली ‘अरेंज मॅरेज’ संदर्भात मुलींच्या बाजूच्या अनेक कथा ऐकतो. म्हणजे “तिचा रंग सावळा होता म्हणून तिला नकार आला.”, “हिला स्वयंपाक करता येत नाही, आता हिचं लग्न कसं होणार?” किंवा “तिची जाडी पाहून मुलं हिला नकार देतात” वगैरे. मात्र अनेकदा मुलांनाही अशा नकारांना सामोरं जावं लागतं. अनेकदा मुलींचं करिअर, किंवा शिक्षण भरपूर नसलं, किंवा खूप आकर्षक नसलं तरी देखील त्यांची स्वप्न ही अनेरिकेत नोकरी करणाऱ्या, किंवा मोठा बिझनस असलेल्या, किंवा वेल सेटल्ड ३ बीएचके, गाडी असलेल्या नवऱ्याची असतात. असे अताना मुलांवर देखील आजच्या काळात पैसे कमावण्याचं भरपूर प्रेशर आहे, हे नाकारता येत नाही. करिअर दृष्ट्या जसं अनेक मुली लग्नानंतर नोकरी नाही केली तरी चालतं, घरूनच काही काम केलं पाहीजे वगैरे विचाराच्या असतात. (हो अजूनही अशा मुली आहेत, आणि ही फॅक्ट नाकारता येत नाही) त्यांची स्वप्न मात्र हाय फाय पैसे कमावणाऱ्या मुलांची असतात. अशा या प्रश्नाला अतिशय सुंदर उत्तर म्हणजे हा लघुपट. 

एकदा तरी नक्की बघावा असा हा लघुपट आहे. तुम्हाला कदाचित हा ‘अनरिअलिस्टिक’ वाटेल, किंवा असं वाटले कि लग्न कर आणि मग कळेल कि पैसे किती महत्वाचे असतात वगैरे. पण अन्विताचे विचार नक्कीच विचार करण्यासारखे आहेत. या लघुपटात मुख्य भूमिका साकारली आहे, अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर यांनी. लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे, कुणाल राणे यांनी तर फिल्मबाझ फिल्मच्या यूट्यूब चॅनल वरुन हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या लघुपटाला २ लाख ६० हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. 

आवर्जून बघा एकदा तरी.. 

 

Powered By Sangraha 9.0