खरं तर तुमच्या पैकी अनेकांनी ही वेबसीरीज आतापर्यंत बघितली असेल. मात्र ज्यांनी नाही बघितली त्यांच्यासाठी खास, आणि ज्यानी बघितली त्यांच्यासाठी पुन्हाएकदा जुई आणि साकेतचे मजेदार आनंदी क्षण जगण्यासाठी..
खरंच.. ही वेबसीरीज बघितली कि आपल्याला असंच वाटतं, आणि काय हवं? जुई आणि साकेत आपल्याला प्रेमात पाडतात. अतिशय गोड गोंडस असं हे कपल. साधंच अगदी तुमच्या आमच्या सारखं वाटणारं पण खूप गोड | पहिल्या भागात तुम्ही त्यांचं लाईफ बघितलंच असेलच. साधारण तसंच दुसऱ्या भागातही आहे, म्हणजे काही हायफाय प्रकार नाही, अगदी साधं आयुष्य जसं तुम्ही आणि मी किंवा कुठलंही कॉस्मोपॉलिटीन यंग कपल आताच्या घडीला जगत असेल, आणि याच कारणामुळे ही वेबसीरीज आपल्याला अक्षरश: या दोघांच्याही प्रेमात पाडते.
या सीझनमध्ये आपल्याला जुई आणि साकेतचं कुत्रा आणि मांजरीविषयी प्रेम बघायला मिळतं, साकेतला वाटणारी भुतांची भिती आणि त्यावर जुईच्या ‘नारळ’ आजोबांच्या भुताच्या गंमतीदार गोष्टी ऐकायला मिळतात, साकेत आजारी पडलव्यावर (म्हणजे अगदी साधी सर्दी झाल्यावर) जुई ज्या प्रमाणे त्याची काळजी घेते ते बघायला मिळतं, साकेतची तबला शिकण्याची धडपड आणि त्यावरून एकूणच जुईची झालेली मजा मजा बघायला मिळते, जुईला कामानिमित्त बंगलोरला जावं लागतं त्यावेळी त्यांच्यातील थोडासा दुरावा देखील बघायला मिळतो, आणि शेवटचा एपिसोड या संपूर्ण सीरीजचा ‘चेरी ऑन द केक’ आहे असं म्हणता येईल. आजच्या दगदगीच्या आयुष्यात अनेक कपल्सचे बेबी प्लानिंग वरुन वाद होतात, मात्र ज्याप्रमाणे जुई ‘तिला बाळ या जगात का आणायचं आहे, त्याला काय काय अनुभव द्यायचे आहेत.’ हे सांगते ना त्यावरुन कुणालाही एकूणच जगण्याची, लाईफची खरी किंमत पुन्हा एकदा कळते.
त्यांच्या अभिनयात सहजपणा दिसतो त्यामुळे कुठेनाकुठे प्रत्येक कपलच्या आयुष्यात असं एकदातरी घडलयं असं जाणवतं. या वेब सिरीजमध्ये एकूण सहा भाग आहेत. प्रत्येक भागात एक वेगळी कहाणी पाहायला मिळते. लग्नाला जवळपास 3 वर्षे झालेलं जुई आणि साकेत हे कपल आपल्याला खूप काही शिकवतं, मात्र अगदी नकळत. हसत खेळत सुखी जीवन जगणारा त्यांचा संसार आहे. यात छोट्या छोट्या गोष्टींमधूनही दोघांना मिळणारा आनंद, प्रत्येक आनंद हटके पद्धतिने सेलिब्रेट करणारं हे कपल त्यांची विविध कहाणी पाहायला छान वाटतं. जुई आणि साकेत दोघंही आपलं करियर सुरु असतानाच आयुष्यातला प्रत्येक दिवस अगदी आनंदाने जगतात. भांडणातही गोडवा असणारं या कपलचा हा सहा भागांचा प्रवास प्रत्येक भागत अतिशय रंजक वळणे घेऊन येतो.
उमेश कामत आणि प्रिया बापट हे रिअल लाईफ कपल असल्यामुळे त्यांच्यातील केमेस्ट्रीविषयी काही बोलणेच नको, मात्र त्यांचे संवाद अतिशय सहज आणि सुरेख आहेत. म्हणजे जुई जशी ओरडते ना “बाथरूम मध्येच झोप मग” ते म्हणजे अगदी आपल्या घरातलं वाक्य वाटतं. एकूणच काय तर गोड गोडंस अशीच ही सीरीज आहे. आणि आपण ऑफिसच्या कामामुळे थकून गेलो असू, किंवा अगदीच काहीही करावसं वाटत नसेल, कोरोनाच्या या सर्व लॉकडाउन परिस्थितीमुळे अनइझी वाटत असेल, डिप्रेस्ड वाटत असेल तर एमएक्स प्लेअर वर ही सीरीज नक्कीच बघावी.
लेखक आणि दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांचं सगळ्यात उत्तम काम म्हणून आपण या वेबसीरीज कडे बघू शकतो. उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी लॉकडाउनमध्ये आपल्यासाठी हे एक गिफ्टच देऊन ठेवलंय असं म्हणता येईल. कारण या वेबसीरीजचा प्रत्येक भाग पुन्हा पुन्हा आपण तितकीच मजा घेत बघू शकतो. त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत ही वेबसीरीज बघितली नसेल तर ती लगेच बघा.