Short and Crisp : पुराना प्यार
कधी कधी काही लघुपट आपल्या थेट हृदयात लागतात. म्हणजे चांगल्याच अर्थाने. एखादा विषय आवडतो, एखादा कलाकार, किंवा एखाद्याचा अभिनय मात्र असं कमी होतं की सगळंच आपल्याला एकाच लघुपटात मिळेल. हा लघुपट त्याला अपवाद आहे. एक अत्यंत सुंदर अनुभूती देणारा, शेवटी एक स्मित हास्य चेहऱ्यावर खुलवणारा असा हा लघुपट आहे. त्याचं कारण म्हणजे त्याची कथा आणि त्यातील कलाकार.
ही कथा आहे एका वयाने मोठ्या पण मनाने अगदी तरुण अलेल्या मुला-मुलीची. हो त्यांना मी आजी आजोबा, किंवा स्त्री पुरुष असं समबोधन नाही देणार. का? ते लघुपट बघितल्यावर तुम्हाला कळेलच. तर एके दिवशी अचानक एका तरुणाला फोन येतो की त्याचे वडील वृद्धाश्रमातून एका महिलेसोबत पळून गेले आहेत. किती गंमतीशीर नाही.. एक वृद्ध गृहस्थ मिसेस शर्मा यांच्यासोबत हिमचाल प्रदेश येथील त्यांच्या गावी पळून जातात. का? कारण प्रेमाला वय नसतं. बायकोच्या निधनानंतर, मुलांना नकोसं झाल्यावर, आपलंसं असं कुणीही नसल्यावर आपण काय करायचं? मरणाची वाट बघायची? की पुन्हा एकदा आयुष्याच्या प्रेमात पडायचं? जगायचं? अनुभवायचं? हसायचं? आणि प्रेम करायचं...अगदी हेच सांगणारा हा लघुपट आहे. या लघुपटाची खासियत अशी की यामध्ये दिग्गज कलाकार म्हणजेच मोहन आगाशे आणि लिलेट दुबे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मोहन आगाशे आणि लिलेट यांचे प्रेम खूपच सुंदर अनुभूती देणारे प्रेम आहे. आपल्या जोडीदाराकडून फारशा अपेक्षा न ठेवणारे प्रेम, जगण्याच्या प्रेमात पडायला शिकवणारे प्रेम, एकमेकांना पुन्हा एकदा सांभाळून घेणारे प्रेम, असे हे प्रेम म्हणता येईल.
या लघुपटात सगळ्यात 'इंटरेस्टिंग' असं काही असेल तर या लघुपटाचा शेवट. आपण विचारही न केलेला. मिसेस शर्मा यांनी उच्चारलेला एकच शब्द, आणि निश:ब्द झालेले प्रेक्षक. असं काय होतं लघुपटाच्या शेवटी? जाणून घेण्यासाठी नक्कीच बघा हा लघुपट.या लघुपटातील आणखी एक विशेष बाब म्हणजे या लघुपटात एक छान सुंदर गाणंही आहे. त्याला आवाज दिला आहे दिग्गज गायक सुरेश वाडकर यांनी. गाण्याचे शब्द, परिस्थितीला अनुरूप असं संगीत आणि सुरेश वाडकर यांचा आवाज म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे.
गोरिल्ला शॉर्ट्स निर्मित या लघुपटाला आतापर्यंत यूट्यूबवर 35 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे अंबर चक्रवर्ती यांनी. आपल्या आयुष्यातील २१ मिनिटे काढून आवर्जून बघावा असा हा लघुपट आहे.
निहारिका पोळ सर्वटे