गृहिणी कुठले काम करु शकत नाही? याचे उत्तर आहे असे एकही काम नाही जे एखादी गृहिणी करु शकत नाही. पुण्याच्या या गृहिणीने अनेकांना हे सिद्ध करुन दाखवले आहे. वयाच्या ५० व्या वर्षी निशा वाळुंज यांनी आपल्या फॅमिली रेस्टॉरेंटचा व्यवसाय ताब्यात घेतला. तसेच केवळ २ वर्षात त्यांनी या व्यवसायाला जागृतावस्थेत आणलं, आणि मुनाफ्यात ३०% ची वाढ करुन दाखवली.
निशा वाळुंज या एक प्रेरणादायी महिला आहेत. त्या महिला शक्तीच्या एक जीवंत उदाहरण आहेत. सतत स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवणारी एक आई आणि पत्नी आता २० वर्ष जुना रेस्टॉरेंटचा व्यवसाय एकहाती सांभाळते हे नक्कीच प्रेरणादायी आहे. चला तर मग भेटूयात निशा वाळुंज यांना. ५० व्या वर्षी बिझनेस स्पिरिट ठेवत प्रेम, आपुलकी आणि मेहनतीने त्यांनी हा व्यवसाय ताब्यात घेतला. लोकांसाठी काही करता यावं या भावनेनं त्यांनी आपल्या पारिवारिक व्यवसायात पूर्णपणे लक्ष घालायला सुरुवात केली आणि बघता बघता एक गृहिणी, उद्योजिका झाली.
गृहिणीची झाली उद्योजिका :
काही काळापूर्वी वाळुंज परिवाराने आपल्या या व्यवसायात अनेक चढ उतार अनुभवले. एका क्षणी या व्यवसायाला बंद करण्याचा विचार मनात आला असताना निशा यांचे सुपुत्र चेतन वाळुंज यांनी त्यांना प्रेरित करत हा व्यवसाय ताब्यात घेण्यास सुचवले. २० वर्षांपासूनच्या या व्यवसायासोबत वाळुंज परिवाराच्या अनेक भावना जोडल्या गेल्या होत्या. आणि हा व्यवसाय टिकवण्यासाठी राजरत्न एक्जिक्युटिव्हला एक नवीन रूप देणे अत्यंत आवश्यक होते. ठरवल्या प्रमाणे निशा यांनी मोठी स्वप्न डोळ्यात घेवून, पूर्ण जबाबदारी स्वीकारत या व्यवसायात काही बदल केले. आणि दोन वर्षांच्या आत त्यांनी या व्यवसायाचे रूपच बदलले.
आधीपासून असलेल्या दोन पंचतारांकित बँक्वेट हॉल्स आणि एक शाकाहारी रेस्टॉरेंट मध्ये काही बदल करत राजरत्न चे एक नवीन आगळे वेगळे रूप फेब्रुवारी २०२० मध्ये सगळ्यांसमोर आले. किचन पासून ते इतर कामं हाताळण्यापर्यंत, फायनॅन्ससाठी नवीन लोकांना रिक्रूट करण्यापासून ते रेस्टॉरेंटला वेगळे रूप देणे आणि व्यवस्थापनापर्यंत सगळं काही निशा यांनी सांभाळले. निशा यांनी या सर्व गोष्टी अतिशय धैर्याने आणि आत्मविश्वासाने हाताळल्या. त्यांच्या या गुणांबद्दल आतापर्यंत त्यांना स्वत:ला देखील कल्पना नव्हती. आता राजरत्न भारतातील प्रमुख रेस्टोरेंट्सच्या यादीत सामिल झाले आहे. जेव्हापासून निशा यांनी सगळं स्वत:च्या ताब्यात घेतलं आहे, तेव्हापासून या व्यवसायाला ३०% लाभ झाला आहे.
आधीची काही वर्षे :
निशा या मूळल्या मनचर जवळील एका गावातल्या आहेत. परिवारातील सगळ्यात मोठी कन्या, त्यांच्यानंतर तीन बहिणी आणि एक भाऊ. लहानपणीपासूनच त्यांनी अनेक जबाबदाऱ्या स्वत: सांभाळात स्वत:च्या बळावर आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी स्वयंपाक शाळेत असतानाच शिकून घेतला. यामुळे त्यांचा आईला मदत व्हायची. त्यांचे वडील एक कृषि अधिकारी होते, ज्यांना लोकांना जेऊ घालणे फार आवडायचे. अशा या स्वयंपाक करण्या आणि खाऊ घालण्याच्या सुंदर संस्कृतीत त्या वाढल्या असल्याने हेच संस्कार त्यांनी लग्नानंतर आपल्या घरी रुजवले.
प्रेम विवाह करत त्यांनी राजीव वाळुंज यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यावेळी त्यांचे वय केवळ १७ वर्षे होते. त्यांनी लग्नानंतर आपले उर्वरित शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी शिक्षण आणि संसार अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्या लीलया पार पाडत होत्या. परिवारातील सगळ्यात मोठी सून म्हणून त्यांच्या खांद्यावर संसाराची मोठी जबाबदारी होती. मात्र हे सर्व पार पाडत असताना अन्नाप्रति असलेलं प्रेम आणि आवड किंचितही कमी झाली नाही. आपल्या वडीलांप्रमाणे त्यांनी तितक्याच प्रेमाने आपल्या परिवाराला आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांना खाऊ घातले.
मात्र या सगळ्यात व्यवसायाबद्दल विचार त्यांच्यामनात कधीच आला नाही. त्या घर आणि परिवाराची काळजी घेण्यात आनंदी होत्या. त्यांना त्यांच्या व्यवस्थापन क्षमतेवर पूर्ण विश्वास होता, मात्र त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता. निशा यांच्या मते, “प्रेम करण्यासाठी अंगी नियोजन, सादरीकरण आणि व्यवस्थापकीय गुण पाहीजेत.” व्यवसायासंबंधी प्रत्येका निर्णयात त्या सहभागी होत असत, कारण त्यांच्या परिवाराचा असा विश्वास होता, कि प्रत्येक निर्णय हा सगळ्यांनी बोलून मग घ्यायचा. त्यामुळे व्यवसायात काय सुरु आहे, हे त्यांना नेहमीच माहीत असायचे. त्यांचा मुलगा चेतन त्यांना घडत असलेल्या घडामोडींविषयी नेहमी सांगत असायचा. त्या रेस्टॉरेंट मधील स्वयंपाकघराच्या पाहणीसाठी आणि तेथील खाद्य पदार्थांच्या चाचणीसाठी नेहमी जात असत. त्यांचे रेस्टॉरेंटमधील कर्मचाऱ्यांसोबत आपुलकीचे संबंध होते.
दोन वर्षात त्यांचा स्वत:वरचा आणि त्यांच्या व्यवसायावरचा आत्मविश्वास वाढला. स्मित हास्य करत त्या सांगतात, “रेस्टॉरेंटचा व्यवसाय हा पूर्णपणे माणसं आणि व्यवस्थापन या दोन गोष्टींवर आधारित असतो. अशी कुठलीही स्कीम किंवा बिझनेस प्लान नाही जो प्रेम, आपुलकी आणि ग्राहकांना स्वत:च्या घरात येणाऱ्या पाहुण्यांप्रमाणे वागणूक या शिवाय काम करेल.” त्यांनी हीच शिकवण त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील दिली आहे.
व्यवसायाचे मूल्य हे सर्वप्रथम अंत:करणाला झाले पाहीजे मगच त्याचा लाभ खिशाला होतो, असे त्या म्हणतात. राजरत्न एक्जिक्युटिव्हला आपल्या परिवाराची मूल्ये लोकांपर्यंत पोहोचवायची होती, आणि त्यांना एक अविस्मरणीय अनुभव द्यायचा होता. निशा वाळुंज यांनी नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले. त्या म्हणतात, “जर मी त्यांना प्रेम आणि आपुलकीची वागणूक दिली नाही तर ते आमच्या रेस्टॉरेंटमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना अशी वागणूक का देतील?”
मूल्ये, मिशन आणि दूरदृष्टी :
निशा यांनी राजरत्न एक्जिक्युटिव्हमध्ये काही अमूलाग्र बदल केले आहेत. तसेच त्यांनी राजरत्न री-लॉंच करण्याचे देखील ठरवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कामावरील प्रत्येक दिवस ध्यान, प्राणायाम आणि गप्पांच्या सेशनद्वारे प्रारंभ होतो. निशा यांचे प्रत्येका कर्मचाऱ्यासोबत वैयक्तिक आपुलकीचे संबंध आहेत आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांना परिवाराप्रमाणेच वागवतात. त्या सांगतता, “जेव्हाही मी लवकर कामावर जाते, मी सर्वांसाठी आधी न्याहारी बनवते आणि मगच आमच्या दिवसाला सुरुवात होते.” बँक्वेटच्या नवीन स्वरूपाकडून त्यांना खूप आशा आहेत. त्यांना पंचतारांकित लग्न समारंभ परवडेल अशा दरात उपलब्ध करुन देण्याची इच्छा आहे. त्यांना त्यांच्या स्टाफच्या आयुष्यात देखील सकारात्मक परिवर्तन घडवायचे आहेत, खासकरून तरुण स्टाफसाठी. या तरुण मंडळीला त्या आपल्या मुलांप्रमाणे वागवतात. त्यांना एक चांगले आयुष्य आणि कार्य वातावरण देण्यासाठी निशा वाळुंज प्रयत्नशील आहेत. निशा यांची इच्छा आहे कि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर व्यावसायिकांनी देखील अशाच कार्यपद्धतीने व्यवसाय करावा.