महाराष्ट्र जपतय किल्ल्यांची परंपरा

17 Nov 2020 16:25:50
भारत भर आपल्याला निरनिराळ्या पद्धतीने दिवाळी सण साजरा झाल्याचा पाहायला मिळते. खरे तर हे आपल्या भूमीला मिळालेले एक वरदानच म्हणावे लागेल. अगदी देशाचे तर राहू द्या, पण परस्पर राज्यांमध्ये देखील आपल्याला या सणांबद्दल खूप विविधता पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणच्या वर्षानुवर्षांपासूनच्या काही चाली-रिती व पद्धती आहेत. महाराष्ट्रात दिवाळीतून दर वर्षी आपल्याला आशीच एक पूर्वापार चालत आलेली पद्धत बघायला मिळते, आणि ती म्हणजे किल्ले बनवण्याची.
 
महाराष्ट्र किल्ल्यांची पर
 
दर वर्षी ज्या प्रमाणे दिवाळी आल्यावर घरातील इतर जबाबदाऱ्या सगळे वाटून घेतात, त्याच प्रमाणे दारात किल्ला बनवण्याची जबाबदारी मात्र घरातील सगळ्या लहान मंडळींची असते. आणि मुले देखील हे काम अत्यंत उत्साहाने स्वीकारतात. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या काळ्या आईशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेली आणि जपलेली या मुलांची नाळ. दिवाळीत किल्ले बनवणे हा मराठी घरांमधील एक संस्कार आहे आणि काळ कितीही बदलला तरी हे संस्कार मात्र कायम राहतील, याचे आश्वासनच प्रत्येक पिढी आपल्या किल्ल्यांमधून करत असते.
 
यंदाच्या वर्षी आपल्याला सगळ्याच गोष्टींचे स्वरूप बदलताना दिसले. शिक्षणसुद्धा पूर्णपणे डीजीटल होताना आपल्याला बघायला मिळाले. राहणीमानात होणाऱ्या या बदलांमुळे येणारी पिढी अर्थातच तंत्रज्ञानाच्या कुशीत वाढत आहे. अशा परिस्थितीत आपली संस्कृती आणि इतिहासाशी असलेले आपले नाते टिकवणे एक अत्यंत किचकट अशी जबाबदारीच म्हणावी लागेल. या दिवाळीत मुले कितपत उत्साहाने किल्ले बनवण्याच्या मागे लागतील याबाबत देखील शंकाच होती. परंतु, दर वर्षीपेक्षा देखील जास्त प्रमाणात आणि अधिक उत्साहाने यंदाच्या दिवाळीत आपल्याला घरोघरी महाराजांचे किल्ले बनवलेले पाहायला मिळाले. आणि घरी असल्यामुळे मुलांबरोबरच मोठ्यांना सुद्धा दिवाळी सणातील या महत्वाच्या उपक्रमात आपला हातभार लावता आला आणि आपले बालपण त्याच निमित्ताने का होईना पुन्हा एकदा जगता आले.
 
महाराष्ट्र किल्ल्यांची पर
 
ही परंपरा केवळ महाराष्ट्रातील कुटुंबांपूर्ती सीमित नसून, ती येथील सामाजिक समरसतेचे प्रतिक आहे. दिवाळी आल्यावर ज्या प्रमाणे आपल्याला कुंभाराकडे पणत्या बघायला मिळतात त्याच प्रमाणे आपल्याला त्याच्याकडे किल्ले सजवायला बनवलेली सुंदर आणि रंगीत खेळणी देखील बघायला मिळतात. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे छोटे पुतळे असतात, कधी युद्धात लढतानाचे तर कधी सिंहासनावर विराजमान असतानाचे. त्या व्यतिरिक्त मराठ्यांचे मावळे, गडावरील प्राणी, गडावर विविध पदार्थ विकायला आलेले विक्रेते या सर्वांची आकर्षक स्वरूपे देखील कुंभाराकडे बघायला मिळतात.
 
हल्ली कुंभाराकडे विकतचे तयार किल्ले देखील मिळतात, ज्या लोकांकडे वेळेचा अगदीच अभाव आहे पण आपल्या इतिहास आणि संस्कृतीसाठीचे प्रेम मात्र अद्यापही कमी झालेले नाही, त्यांच्यासाठी हा उपयुक्त पर्याय आहे.
 
महाराष्ट्र किल्ल्यांची पर
 
तसे बघायला गेले तर महारष्ट्र हे काही एकमेव राज्य नव्हे जिथे आपल्याला किल्ल्यांचा एवढा प्रखर इतिहास आढळतो. पण हे एकमेव असे राज्य आहे जिथे किल्ल्यांचे महत्त्व अफाड आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे निसर्गाने महाराष्ट्र भूमीला दिलेला सह्यरूपी आशीर्वाद. या सह्याद्रीच्याच जोरावर स्वराज्य उभे राहू शकले व शिवाजी राजे प्रचंडगड म्हणजेच तोरणा किल्ल्याला स्वराज्याचे तोरण बांधू शकले. मराठ्यांचा गनिमी कावा टिकू शकला तो देखील या सह्याद्रीच्याच कृपेने. त्यामुळे सह्याद्रीतील हे किल्ले इथल्या लोकांच्या आयुष्यातील व संस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा घटक आहेत.
 
दिवाळीतील या किल्ल्यांच्या माध्यमातून मुले आपल्या राजाबद्दल ज्ञान प्राप्त करतात ते ही मुलांना आवडेल आणि मजा येईल अशा पद्धतीने. महारष्ट्रातील या परम्परेमुळेच इथल्या लहानातील लहान मुलाला देखील आपल्या छत्रपतींचे पराक्रम माहित आहेत आणि येत्या काळात सुद्धा आपल्या इतिहासाबद्दलचे हे ज्ञान आणि महाराजांसाठीची ही आपुलकी कुठे ही हरवणार नाही याची खात्री तेवढी आताच्या पिढीने चोख दिली आहे.
Powered By Sangraha 9.0