आम्ही 'मराठी'च्या पुन्हा जवळ आलो ते यांच्यामुळे...

07 Jan 2020 22:24:09

मराठी साहित्य, मराठी संगीत, मराठी कविता यांचा इतिहास खूप जुना आहे, मात्र आजच्या पिढीपर्यंत ही भाषा पोहोचावी, आणि केवळ पोहोचणेच नव्हे तर त्यांना ती खूप आवडावी यासाठी अनेकांनी खूप मेहनत घेतली आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांपासून ते आजच्या मराठी भावगीतांपर्यंत अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या ही मराठी भाषा नवीन पिढीच्या मनात खोलवर उतरवण्यासाठी, या भाषेची गोडी लावण्यासाठी आणि या भाषेला आपलंसं मानण्यासाठी. आम्हाला मराठी गाणी आणि कविता आपल्याशा वाटायला लागल्या, आवडायला लागल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी युवा पिढीला या भाषेची ओढ निर्माण झाली यामध्ये काही कलाकारांचा सिंहाचा वाटा आहे.


marathi_1  H x


लहानपणी ऐकलेली बालगीतं आठवतात? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, खोडी माझी काढाल तर, टोळ आणि मुंगी अशा कितीतरी कविता आणि गोष्टींच्या कॅसेट्स त्यावेळी यायच्या आणि मी आणि माझा भाऊ त्यात रंगून जाऊन त्या कॅसेट्स ऐकत बसायचो. मात्र त्यानंतर असे गाणे, बालगीतं किंवा लहान मुलांना आणि तरुण पिढीला मराठी गाणी आवडतील अशी गाणी ऐकता आली ती आयुष्यावर बोलू काही आणि अग्गं बाई ढग्गं बाई या मुळेच. मधल्या काळात अशा पद्धतीच्या गाण्यांचा एक मोठा व्हॅक्यूम निर्माण झाला होता. मात्र संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या जोडीनं पुन्हा एकदा तरुणाईच्या मनात मराठी भाषेप्रति आपलेपण जागवलं आणि ते खोलवर रुतून बसलं. केवळ तेच नाही तर असे आणखी काही कलाकार आहेत ज्यांच्यामुळे आज मराठीपासून दूर गेलेले किंवा दूर जाऊ शकणारे तरुण मराठीच्या तितक्याच जवळ आले आहेत. 

 


आयुष्यावर बोलू काही : 

माझ्या सारख्याच अनेकांची टीन एज जरा चुकीचे जरा बरोबर, सरीवर सर, मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही, तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊस ही, हे ऐकण्यात गेली असणार याची खात्री आहे मला. आयुष्यावर बोलू काहीचे आज किती शे कार्यक्रम झाले आहेत. मात्र प्रत्येक कार्यक्रमाला तुंबड गर्दी असते, आणि यातील विशेष बाब म्हणजे ही गर्दी असते ती तरुणांची, त्या दिवशी कुठलाही मोठा चित्रपट का रिलीझ होऊ देत, मात्र मित्रांचा ग्रुप जरा चुकीचे जरा बरोबर ऐकायलाच येणार याची खात्री असते. २००३ मध्ये हा एल्बम आला, आणि त्याचे कार्यक्रम सुरु झाले, आज २०२० म्हणजे लवकरच या कार्यक्रमाला 17 वर्षे पूर्ण होतील, आणि तरीही आजही, तरुणांच्या पिढ्या बदलूनही तरुणांची या कार्यक्रमाला तितकीच गर्दी असते. पुढे नामंजूर, अग्गं बाई ढग्गं बाई, असे अनेक एल्बम्स आले यांचे, आणि या एल्बम्स मधील गाण्यांचा समावेश देखील संदीप सलिल ने आपल्या कार्यक्रमात केला. आमच्या पिढीला मराठी गाण्यांची पुन्हा एकदा गोडी लावली ती या जोडीने. 


marathi_1  H x

गुरु ठाकुर :

अनेकदा गाणं खूप उत्तम असतं, त्याच्या तालावर आपण ठेका धरतो आणि आपल्याला गाणं आवडतं, मात्र एखादं गाणं मनाला कधी भिडतं? त्याचे शब्द आपल्या मनापर्य़ंत पोहोचल्यावर. गुरु ठाकुरच्या लेखणीतून जन्म घेतलेल्या गाण्यांचं असंच आहे. आमच्या पिढीला कविता लिहीण्यासाठी प्रेरित करणारा माणूस म्हणजे ‘गुरु ठाकुर’. 



मंगलाष्टक वन्स मोअर मधलं गाणं, “सर सुखाची श्रावणी कि नाचरा वळीव हा” आठवतं. आजही अनेकांच्या मोबाइल प्लेलिस्ट मध्ये हे गाणं असणार. किंवा बालक पालक मधील “हरवली पाखरे” ते ही असंच मनाला भिडणारं गाणं. अशी एक नाही अनेक गाणी आहेत आणि त्याहून जास्त चारोळ्या. त्याच्या लेखणीतील ताकदीने आमच्या सारख्या कवितेची आवड असणाऱ्या, गाण्याची आवड असणाऱ्या तरुणांना मराठी शब्दांची भुरळ पाडली. त्यासाठी गुरु ठाकूर ला आमच्या पिढीकडून खूप खूप धन्यवाद.


marathi_1  H x


झी मराठी मालिकांचे टायटल ट्रॅक :


घराघरांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत मराठी भाषा पोहोचविण्यात खूप मोठा वाटा आहे झी मराठीचा. आजही झी मराठीच्या मालिकांचे टायटल ट्रॅक्स माझ्या सारख्या अनेकांच्या ओठांवर असतील. “थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले कधी चांदणे टिपुर तुझ्या डोळ्यात वाचले.” किंवा “आभाळमाया”, “कुलवधू”, “होणार सून मी या घरची”, “अवघाची हा संसार”, “अधुरी एक कहाणी”, “कळत नकळत” आणि सगळ्यांचं लाडकं म्हणजे “चांदण चाहूल होती कोवळ्या पाउली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली” म्हणजेच उंच माझा झोकाचे शीर्षक गीत आपल्या मनावर आजही कोरले गेले आहेत.

marathi_1  H x

संध्याकाळी सर्व मराठी घरांमधून या मालिका लागायच्या आणि आपसुकच आपण ही गाणी म्हणायला लागायचो. यामध्ये अशोक पत्की यांच्या संगीताची जादू आणि देवकी पंडित आणि अशाच दिग्गजांचे आवाज यामुळे ही गाणी आणि मराठी भाषा आपल्या खूप जवळची झाली. 


सा रे गा मा पा लिटील चॅम्प्स : 

मराठी सारेगामापा लिटील चॅम्प्सचा पहिला सीझन आला २००९ मध्ये म्हणजे १० वर्षांआधी. आणि तेव्हापासून सर्व मराठी गाणी, मराठी संगीत आणि एकूणच मराठी भाषेशी पुन्हा एकदा आम्हा तरुणांची मैत्री झाली. मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, आर्या आंबेकर आणि प्रथमेश लघाटे यांचे मस्त परफॉर्मंसेस आणि अवधूत दादा आणि वैशाली ताईचे कॉमेंट्स पल्लवी ताईचं सूत्रसंचालन हे सगळंच रोजच्या आयुष्याचा एक भाग झालं होतं. यामुळेच पुन्हा एकदा शिवकल्याण राजा ऐकायला मिळालं, आणि अशी अनेक गाणी ऐकायला मिळाली जी कदाचित आमच्यापासून थोडी लांब गेली होती. 



या शिवाय मराठी चित्रपटांच्या बदलत्या स्वरूपामुळे मी शिवाजी राजे भोसले किंवा टिळक, बालगंधर्व किंवा अगदी आम्ही दोघी आणि कट्यार सारख्या चित्रपटांमुळे त्यातील गाण्यांमुळे आमची पिढी पुन्हा एकदा मराठीच्या जवळ आली. यामध्ये राहुल देशपांडे आणि महेश काळे तसेच मराठी अभिमान गीत जागसमोर आणणाऱ्या कौशल इनामदार यांचा देखील मोठा वाटा आहे. 
 

marathi_1  H x  


एकूणच मराठी चित्रपट सृष्टी, मालिका, कार्यक्रम आणि संगीताच्या बदलत्या स्वरूपाने मराठी पासून दूर जात असलेल्या तरुणांना मराठीच्या खूप खूप जवळ आणले आहे, आणि त्यासाठी ही तरुणाई या सर्व दिग्गजांचे आभार मानते. 

- निहारिका पोळ सर्वटे

 


Powered By Sangraha 9.0