“तान्हाजी”.... आजच्या काळासाठी अत्यंत आवश्यक असा चित्रपट

13 Jan 2020 17:25:16


tanhaji_1  H x


आजच्या काळात मराठमोळ्या इतिहासाचा साक्षी संपूर्ण देशाला आणि जगाला बनवणं यासाठी ओम राऊत यांचे खूप खूप आभार. सुबेदार तान्हाजी मालुसरे हे नाव सर्व मराठी घरांमधून लहानपणी गोष्टींच्या माध्यमातून प्रत्येका लहान मुलाच्या कानावर पडलंच असणार. पण या मर्द मराठ्या तान्हाजीला महाराष्ट्राबाहेर आणून संपूर्ण देशा पर्यंत पोहोचविले ते म्हणजे ओम राऊतच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने. आजच्या काळात जिथे छोट्या मोठ्या गोष्टींवरुन आंदोलनं आणि भारत तेरे टुकडे असं सगळं म्हटलं जातं तिथे हा चित्रपट एका मराठमोळ्या तरुणाच्या शौर्याची गाथा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संपूर्ण जगाला घेऊन जातो, आणि तान्हाजी सारख्या शिवरायांच्या उजव्या हाताच्या बहादुरीला केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातील लहान मुलांच्या मनात बिंबवतो. 

चित्रपटात सर्वच कलाकारांनी सुरेख असा अभिनय केला आहे. अजय देवगणने उत्तम तानाजी पडद्यावर उभा केला, काजेलने सावित्रीची भूमिका सुंदर वठवली आणि या सगळ्यात सर्वात सुरेख काम केलं ते म्हणजे शरद केळकर यांनी, त्यांच्या रुपात छत्रपती शिवाजी महाराजच असल्याचा भास प्रेक्षकांना नक्कीच झाला असणार. चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला खेळवून ठेवतो. तान्हीजीची जी शौर्यकथा लहानपणी आपण ऐकली असणार ती डोळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाने नक्कीच केला आहे. अजय देवगणचे एक्शन आणि त्यांचा अभिनय सुरेख आहे. थोड्या मोठ्या प्रमाणात मराठी भाषेचा अधिक वापर करता आला असता, असं देखील वाटून जातं. सूर्याजीच्या भूमिकेत देवदत्त नागे, शेलार मामांच्या भूमिकेत शशांक शेंडे, पिसाळ यांच्या भूमिकेत अजिंक्य देव या मराठमोळ्या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शकाचे कौतुक म्हणजे तान्हाजी मालुसरे दाखवत असताना त्यांनी कुठेही छत्रपती शिवाजी महारांजांना कमी दाखवलेलं नाही. हे खूप मोठं चॅलेंज होतं, मात्र दिग्दर्शकांनी ते उत्तम पेललं आहे. 

चित्रपटाचं संगीत उत्तमच. खास करुन माय भवानी गाणं.. आपल्याला तालावर ठेका घरायला लावतं. सगळ्यात जास्त आवडलेली बाब म्हणजे संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटांमध्ये ज्या प्रमाणे त्यांच्या काशीबाई आणि मस्तानी अतिशय ग्लॅमरस दिसतात तशी काजोल यामध्ये नाही दिसली, मराठमोळा लुक तिला छान सूट झालाय. 




सैफ अली खानने चांगला अभिनय केला आहे. पद्मावत मध्ये ज्याप्रमाणे खिलजीला अधिक स्क्रीनस्पेस देऊन एका प्रकाराने त्याचे उदात्तीकरणच झाले, तसे यामध्ये अजिबात झालेले नाही ही आनंदाची बाब. चित्रपटात सिनॅमॅटिक लिबर्टी नक्कीच घेण्यात आली आहे. मोहीमेच्या आधी तान्हाजीचे कोंढाण्यावर येणे, त्याला अटक होणे हे सगळे काल्पनिक आणि आणि इतिहासात याचे पुरावे नाहीत त्यामुळे या बाबी इतिहास माहिती असणाऱ्या व्यक्तिला नक्कीच खटकू शकतात, मात्र आजच्या काळात तान्हाजी सारख्या मराठमोळ्या शूरवीराची गाथा ज्या प्रमाणे जगापुढे या चित्रपटात मांडण्यात आली आहे, ती बघता या सर्व गोष्टींवर अधिक विचार न करावा असे वाटते. 

एकूणच आता पर्यंत आपल्याला बाजीराव मस्तानी, पद्मावत, पानीपत अशा चित्रपटांमधून ग्लॅमरस अशा इतिहासाला बघण्याची सवय झाली होती, मात्र सिनॅमॅटिक लिबर्टी घेऊन सुद्धा उत्कृष्ट चित्रपट कसा काढावा हे तान्हाजी मधून दिसून येतं. आजच्या काळात जिथे हिंदुत्वावर एक शब्दही बोलल्यास आपल्याला कम्युनल ठरवण्यात येतं, जिथे भगवा रंग हातात घेतल्यास आपल्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येतात, जिथे इतिहास म्हणजे केवळ अकबर बाबर आणि मुगलांचा इतिहास असतो, तिथे तान्हाजी सारखा चित्रपट अतिशय आवश्यक आणि महत्वाचा ठरतो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही, वेळात वेळ काढून हा चित्रपट बघून यावे. 

- निहारिका पोळ सर्वटे

Powered By Sangraha 9.0