तोत्तोचान ही कुणी वेगळी नाही. ती तुमच्या माझ्यातीलच एक लहानगी मुलगी. अतिशय चंचल (आपल्या पैकी अनेक जणी लहानपणी अशाच चंचल स्वभावाच्या असतील.) पक्ष्यांशी गप्पा मारणारी, डेस्क सारखा उघडणारी, बँडवाल्यांशी बोलणारी तोत्तोचान. तिच्या या चंचल स्वभावामुळे तिला शाळेतून काढून जरी टाकलं असलं तरी ती तशीच मज्जेत, निवांत, निरागस, गोड. या पुस्तकातील सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे "तोमोई शाळा". झाडाच्या खांबांचे गेट असलेली आणि रेल्वेच्या डब्यात वर्ग भरणारी ही शाळा तोत्तोचानला पाहताक्षणीच आवडते. शाळेचे मुख्याध्यापक कोबायाशी तिला बोलायला सांगतात आणि ती पूर्ण चार तास त्यांच्याशी गप्पा मारते. मुख्याध्यपकांचा मोकळा स्वभाव, तिची निरागसता, हे सगळंच मनाला खूप भावतं.
पुस्तकाच्या शेवटी अक्षरश: डोळ्यात पाणी येतं. त्याचं कारण म्हणजे त्यावेळी जपान वर बॉम्ब हल्ले होत असत, जपानची राजकीय परिस्थिती यातून जाणवते, आणि असाच एक बॉम्ब तोमोई शाळेवर पडतो, तोत्तोचानचा रॉकी नाहीसा होतो, तिचा जिवलग मित्र यासुकीचान देवाघरी जातो, आणि वाचक.... त्यांच्या डोळ्यांमधून अश्रुधार वाहत असते.
तोत्तोचान आजही खूपच मनाच्या जवळ असणारे पुस्तक आहे. तोत्तोचानची निरागसता आजच्या मुलांमध्ये असेल का नाही माहित नाही. तिच्यातले गुण एका खूप वेगळ्या व्यक्तिमत्वाचे उदाहरण आहेत. आपण ठरवलं तरीही कदाचित आपल्याला तसं होता येणार नाही. ती पक्ष्यांशी गप्पा मारते, कारण निसर्ग तिला आपलासा वाटतो. तिच्यासाठी कुणीच छोटं मोठं नाही, त्यामुळे ती सगळ्यांनाच अगदी बँडवाल्यांना देखील एक सारखंच वागवते ते देखील प्रेमानी. तोमोई शाळा राख झाल्यानंतर तिचे निरागस प्रश्न आपल्यालाच अनुत्तरित करतात.
कोबायाशींची शिक्षण पद्धती मार्गदर्शक :
या पुस्तकातील कोबायाशींची शिक्षण पद्धती खरंच मार्गदर्शक आहे, मुलांना केवळ शालेय शिक्षण देवून चालत नाही तर नैतिक शिक्षण, मूल्याधिष्ठित समाज बनवण्यासाठी व्यक्तिमत्व विकास हे सर्वच देणारी ही शिक्षण पद्धती आहे. शाळेचे रेल्वेचे डब्बे आजच्या भव्य दिव्य शालेय इमारतींना आरसा दाखवतात. त्यांची ही शिक्षण पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला खूप काही शिकवून जाते.
तोत्तोचान आपल्यातलीच वाटते कारण ती निरागस आहे, अल्लड आहे, तिच्यात खरेपणा आहे, तिच्यात मेहनत आहे, तिच्यात नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आहे, तिच्यात बालपण आहे, तिच्यात आपण स्वत:ला शोधू शकतो, बघू शकतो. तिच्यात आपल्याला स्वत:चं प्रतिबिंब दिसतं.
जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो तेव्हा कुठेतरी त्याच्याशी रिलेट होता आलं पाहिजे. त्या पुस्तकाच्या विश्वात शिरल्या शिवाय त्याची मजा घेताच येत नाही. खरंय वाचन, पुस्तकं आपल्याला जगण्याचा एक नवीन अनुभव देतात. तोत्तोचानचं विश्वच वेगळं आहे, आपल्याला खूप काही शिकवणारं, आपल्यातलं बालपण जागं करणारं. आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं एखाद्या सुंदर आणि वेगळ्या पुस्तकाची आठवण काढायची असेल तर तोत्तोचान सारखं पुस्तक दुसरं नाही..
लहानगी तोत्तोचान आजही जीवंत आहे.. त्याच निरागसतेसह... पुस्तकात.. माझ्यात आणि तुमच्यातही..