'सरफ़रोशी की तमन्ना
अब हमारे दिल में है,
देखना है ज़ोर कितना,
बाज़ु-ए-क़ातिल में है'
-बिस्मिल' अज़ीमाबादी
भारत हा असा देश आहे, ज्या देशात एकूण लोकसंखेतला मोठा भाग हा तरुण वर्गाचा आहे. ज्या देशात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो त्या देशात सर्वांगीण दृष्टीने विकसित होण्याची जास्त क्षमता (Potential) असते. आणि भरीत भर म्हणजे जर त्या मातृभूमीला तरूण पिढीची ऐतिहासिक वारसा असेल तर मग सोने पे सुहागा. या गोष्टीचं उदाहरण आपल्याला २३ मार्च रोजी साजरी केल्या जाणाऱ्या शहीद दिवस या निम्मित्ताने दिसून येते. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे महान स्वतंत्रता सेनानी शहीद राजगुरू, सुखदेव ,भगतसिंग यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
२३ मार्च रोजी हे तरुण हसत हसत फाशीवर चढले. या तरुणांमध्ये परकीय सत्तेकडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची आग होती. समोरील विरोधक हे सर्वच बाबतीत शक्तिमान होते. तरीही या तरुणांनी आपला विश्वास कमी होऊ न देता लढत राहिले ते अगदी फाशीवर चढेपर्यंत. या घटनेतून आताच्या आणि पुढील पिढीला घेण्यासारखे खूप काही आहे. आपण आजूबाजूच्या घटनेवरून बघत असतो की काही तरुण वर्ग आपल्या वयाच्या मानाने इच्छाशक्तीच्या जोरावर यशाची शिखरे गाठत आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. पण आता अशाही घटना एकू येत आहेत ज्यात तरुण पिढी वेगळ्याच वाटेवर लढत आहे.
महान स्वतंत्र सेनानी शहीद राजगुरू, सुखदेव ,भगतसिंग यांच्या समोर परकीय शत्रू उभे होते. ते देश सोडून गेले पण आताच्या तरुण वर्गाला वेगळीच
'निराशा' बोचत आहे. या निराशेपोटी बऱ्याच आत्महत्या होताना दिसत आहेत. अगदी
सुप्रसिद्ध सुशांत सिंग राजपूत ते
कुस्तीपटू रितिका फोगाट पर्यंत. कोणालाही आपला प्रवास माहित नसतो. फक्त रस्त्यावर चालत राहणे हा एकमेव पर्याय वाटेकरूकडे असतो. चालायचं...पडायचं...आणि पुन्हा उठून चालायला लागायचं.
आजच्या शहीद दिवस या दिनानिम्मित्ताने जास्त काही नाही पण एक संदेश तरुणांपर्यंत पोहचला पाहिजे. कोणतीही प्रक्रिया एकदम घडत नाही,वेळ घेते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आणि जिद्दीने पुढे जाऊन आपली स्वप्ने कणाकणात मुरवून आणि विचारांना कृतीची जोड देऊन आयुष्याचा आनंद घेत चालत राहायचं म्हणजे स्वतःचा आणि देशाचा सर्वांगीण विकास व्हायला कोणीही अडवू शकत नाही. अशाप्रकारे या देशाची पिढी राष्ट्रासाठी आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करेल तेव्हा या शुर वीरांना खरी श्रद्धांजली मिळेल.
इतनीसी बात, हवाओ को बताए रखना ,
रोशनी होगी चीरागो को जलाये रखना,
लहू देकर की है जिसकी हिफाजत हमने,
ऐसे तिरंगे को हमेशा अपने दिल में बसाये रखना!