वैक्सीन मैत्रीच्या माध्यमातून जमैकाला लस भेट दिल्याबद्दल क्रिस गेलकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार
|
संकटाच्या वेळी मदत करणे ही भारताची खूप जुनी परंपरा आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा जगाला 'वैक्सीन मैत्रीच्या' माध्यमातून अनुभवायला मिळत आहे. कोरोना सारख्या गंभीर महामारीमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. वेगवेगळ्या स्तरावर या महामारीतून मनुष्यप्राण्याला सुखरूप वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यापैकी एक प्रयत्न कोरोना लसीच्या स्वरुपात होत आहे. काही मोजक्याच देशांनी अशी लस तयार करण्यात यश मिळवले आहे, त्यात भारत एक! भारतामध्ये सिरमने बनवलेली 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीने बनवलेली 'कोवैक्सीन' अशा दोन लसी सध्या चर्चेत आहे.
16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशातील गरज भागवता भारत सरकार शेजारील देशांना लसीच्या स्वरुपात मदत करत आहे. ही सुरुवात शेजारील भूटान, नेपाल, बांगलादेश, मालदिव इ. देशांना लस पाठवून करण्यात आली. यासोबतच कॅरेबिअन देश उदाहरणार्थ जमैका यांना लस उपलब्ध करून दिल्याचे सांगितले जात आहे . वेस्ट इंडीज क्रिकेटपटू क्रिस गेलने याबद्दल ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. नुकतच भारताचे परराष्ट्रमंत्री यांनी आपल्या ट्विट द्वारे प्रशांत महासारातील सॉलोमन द्वीपसमूहाला ही आपण लस पुरवल्याची माहिती दिली. अशाप्रकारे वैक्सीन मैत्रीच्या माध्यमातून या महामारीतून कमीतकमी जीवित हानी व्हावी या उद्देशाने भारत सरकार जगातील देशांना साहाय्य करत आहे.