गेल्या काही दिवसांपासून निराशेपोटी तरुण वर्गातील आत्महत्येच्या बातम्यांनी जोर धरला आहे. या गोष्टीवर पुन्हा एकदा लक्ष वेधून घेणारी अजून एक घटना घडली. 'दंगल गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या बबिता फोगाट आणि गीता फोगाट यांची मामेबहिण रितिका फोगाट हिने आपले गुरु महाबीर फोगाट यांचे गाव बलाली येथे आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे.
रितिकाने भरतपूरमधील लोहागढ स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर आणि ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. फक्त १७ वय असलेली रितिका फोगाट ही या प्रराभवानंतर निराश झाली होती. या स्पर्धेत अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव तिच्या जिव्हारी लागला आणि तो सहन न झाल्याने तिने सोमवारी रात्री खोलीतील पंख्याला ओढणी बांधून फाशी घेतली.
आपल्या बहिणी बबिता फोगाट आणि गीता फोगाट याप्रमाणे आपणही कुस्ती मध्ये खूप चमकावे अशी तिची इच्छा होती. यासाठी ती प्रसिद्ध कुस्तीपटू महाबीर फोगाट यांच्या अकादमी मध्ये मागील पाच वर्षांपासून सराव करत होती. रितिकाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केला. या घटनेवर रितिकाची बहिण रितू फोगाटने ट्वीट करत आपल्या बहिणीच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना केली.