Short and Crisp : फॅमिली : सिनेसृष्टीतील कामगारांसाठी कलाकार आले एकत्र

    07-Apr-2020   
|

आताच्या घडीला आपला भारत देश एक मोठ्या संकटातून जातोय. कोरोना महामारीमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामध्ये एक खूप मोठा वर्ग आहे जो सिनेसृष्टीसाठी काम करतो. तो म्हणजे सिनेसृष्टीत रोजनदारीवर काम करणारा कर्मचारी वर्ग. या सर्व कामगारांसाठी आज हिंदी, मराठी, दाक्षिणात्य, बंगाली, पंजाबी अशा सर्व भाषांमधील कलाकार एकत्र आले आहेत. आणि त्यांनी फॅमिली नावाचा हा लघुपट आज प्रसिद्ध केला आहे.


Family_1  H x W


तर या लघुपटाची कथा अतिशय सोपी आणि साधी अशी आहे. अमिताभ बच्चन यांचे गॉगल हरवले आहेत, आणि सर्व कलाकार मिळून तो गॉगल शोधताएत. मात्र आपापल्या घरी राहून असे शूट करून हा लघुपट या कठीण काळात आणणं आणि याच्या माध्यमातून सिनेसृष्टीतील कामगारांसाठी निधी एकत्र करणं एक खूप मोठी बाब आहे.


आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल कि लॉकडाउन असताना या लघुपटाचे चित्रीकरण कसे झाले असणार? त्याचं उत्तर म्हणजे याचे चित्रीकरण सर्व कलाकारांनी आपापल्या घरी राहून केले आहे. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, दिलजीत दोसांझ, मोहनलाल, चिरंजीवी, रजनीकांत, आलिया भट्ट, मॅमोथी, सोनाली कुलकर्णी, प्रोसेनजीत चॅटर्जी आणि शिवा राजकुमार यांनी अभिनय केला आहे. आणि या लघुपटाला व्हर्चुअली दिग्दर्शित केले आहे, प्रसून पांडे यांनी.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या कलाकारांचे कौतुक करत त्यांच्या या लघुपटाची प्रशंसा केली आहे. ते म्हणतात, "दूर राहून देखील आपण सगळे एकत्र येऊ शकतो. एक खूप चांगला व्हिडियो एका योग्य संदेशासह. तुम्ही देखील बघा." 



या लघुपटाच्या शेवटी अमिताभ बच्चन यांनी संदेश दिला आहे कि सिनेसृष्टी एक आहे. यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, आणि आज या कठीण काळात आम्ही सर्व एकत्र येऊन सिनेसृष्टीतील कामगारांसाठी निधी एकत्र करत आहोत. जेणेकरून त्यांना मदत होऊ शकेल. याआधी काल इतर काही कलाकारांनी मिळून ‘मुस्कुराएगा’ इंडिया नावाचा व्हिडियो देखिल प्रदर्शित केला होता. यामाध्यमातून देखील निधी एकत्र करण्यात आला आहे. एकूणच कठीण परिस्थिती सिनेसृष्टीने एकत्र येवून नागरिकांना मदत करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे इंटरनेटवर सर्व स्तरातून या कलाकारांचं कौतुक होत आहे.


- निहारिका पोळ सर्वटे