आता कुठे गेली ‘असहिष्णुता’? सेलिब्रिटीज ‘गप्प’ का?

    22-Apr-2020   
|

पालघर येथे घडलेल्या भीषण प्रकाराबद्दल आता पर्यंत भरपूर बोललं आणि लिहीलं गेलं, अनेकांनी आरोप लावले कि, पालघर येथे साधूंच्या झालेल्या ‘मॉब लिंचींग’ ला ‘धर्माचा’ रंग देण्यात येतोय. मात्र इथे प्रश्न घडलेल्या प्रकाराला हिंदु मुस्लिम असे करण्याचा नाही, तर आधी अशा प्रकारच्या घडलेल्या घटनांना ज्या प्रकारे बघण्यात आले, त्यात आणि यात फरक का करण्यात आला?, असा आहे. ते ही समाजातील अतिप्रतिष्ठित लोकांकडून. आज आपण इथे केवळ आणि केवळ सेलेब्रिटीज बद्दल बोलणार आहोत. पालघर प्रकरण झाल्यापासून एकाही तथाकथित पुरोगामी सेलिब्रिटीच्या इंस्टाग्रामवर घाबरून केलेला व्हिडियो किंवा पोस्टर हातात घेऊन पोस्ट केलेला फोटो दिसला का? देशात ‘असहिष्णुता’ आहे असं म्हणणारा एकही असा कलाकार दिसला का? लॉकडाउनमुळे आता देश सोडून जाणे शक्य नाही, मात्र तशी इच्छा असणारा एक तरी कलाकार दिसला का?


palghar_1  H x


यापूर्वी ‘मॉब लिंचींग’ हा शब्द कळला आणि प्रसिद्ध झाला तो म्हणजे ‘अखलाक’च्या प्रकरणावरुन. त्यानंतर कदाचित असे अनेक प्रसंग झाले असतील. मात्र त्यात मृत्युमुखी पडलेली व्यक्ति ही अल्पसंख्यांक समाजातील नसल्याने त्या विषयी वाच्यता करण्यात आली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून पालघर प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण तापलं आणि याविषयी सरकारला जाब विचारण्यात आला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील “आग लावू नका, धर्माचा रंग देऊ नका’ वगैरे वक्तव्य केले. प्रश्न उठतो तो असा, कि हिंदुंवर अत्याचार झाले कीच ‘धर्माचा रंग देऊ नका’ वगैरै का आठवतं मोठ्या मंडळींना? असे वक्तव्य अखलाकच्या वेळी किंवा इतर प्रकरणांमध्ये का देण्यात आले नाहीत? अखलाक प्रकरणाच्या वेळी सर्व स्तरातून हा विषय उचलून घरण्यात आला. मॉब लिंचींगला जात धर्म नसतो. कुणाही सोबत असं झालं तर ते अतिशय वाईट आहेच. मात्र तसं असेल तर केवळ एका विशिष्ट व्यक्ति किंवा प्रकरणासाठीच हे निकष का लावले जातात?


अखलाक आणि आसिफाच्या प्रकरणांवेळी सोशल मीडिया पोस्ट्स ने ओसंडून वाहत होते. अनेक लोक पोस्टर्स घेऊन आपले फोटोज टाकत होते, हॅशटॅग्स प्रसिद्ध होत होते. आणि हे सर्वच स्तरातून होत होतं. यामध्ये कलाकार मंडळींचा मोठा सहभाग होता. मात्र आता तसं दिसंत नाही? आणि चूकून माकून पालघर प्रकरणाविषयी एखादं ट्विट दिसलं जरी तरी त्यामध्ये ‘धर्माचा रंग देऊ नका’ असं हमखास म्हटलेलं असतं. हिंदूंसोबत काही घडलं कीच ते कसं मानवतेविरोधी आहे, यात जात धर्म आणू नका वगैरै होते ? पालघर प्रकरणात ‘हिंदू - मुस्लिम’ असा वाद कुणीच करत नाहीये. मात्र हिंदू साधू ठेचून ठेचून मारल्या गेले, ७० वर्षाचे म्हातारे निरागस साधू. ज्यांचा पोलिसांवर भाभडा विश्वास होता, कि पोलिस आपल्याला काहीच होऊ देणार नाहीत. असे सगळे झाल्यानंतर कुणालाही असहिष्णुतेची आठवण आली नाही, पुरस्कार वापसी झाली नाही, सेलिब्रिटीजच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम वरुन पोस्ट्स दिसले नाहीत. एखाद दुसरी पोस्ट दिसली जरी, तरी त्याची तीव्रता देखील तितकी नव्हती. असे का?

प्रत्येक वेळेला एका विशिष्ट धर्माला वेगळी वागणूक देऊन, दुसऱ्या विशिष्ट धर्मानेच नमतं घ्यायचं हे देखील अतिशय चूक आहे. याविषयी पत्रकारांमध्ये देखील सुधीर चौधरी, रजत शर्मा, अर्णब गोस्वामी, यांच्या सारखे इक्का दुक्का पत्रकार सोडले तर कुणीही प्राईम टाईम घेत नाही, रवीश कुमार ने आपल्या फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहीली आहे. पण कधी? जेव्हा लोकांनी त्यांना जाब विचारला कि अखलाक प्रकरणावरुन टीकेची झोड उठवणारे रवीश कुमार गप्प का? या पोस्टमध्ये देखील त्यांनी घटनेचा विरोध ४ ओळीत आणि उर्वरित पोस्ट मध्ये आयटी सेल वाले लोक त्यांच्यावर कशी टीका करतात हेच सांगितले आहे. लोकांच्या भितीमुळे यांची एखादी पोस्ट दिसली जरी तरी त्यात तीव्रता दिसून येते का तर नाही ?


palghar_1  H x


कसं असतं देशात एका विशिष्ट वर्गाच्या व्यक्तिसोबत एखादी घटना घडली तर त्याला मुद्दाम मोठं केलं जातं, आणि दुसरीकडे दुसऱ्या वर्गासोबत घडली तर मुद्दाम दुर्लक्षित. पालघर प्रकरण भीषण, भयंकर आणि थरकाप उडवणारं आहे. आणि त्याला धार्मिक रंग येऊ नये ही इच्छा असेल तर सर्वांनी.. अगदी सर्वांनीच या विरोधात स्वर बुलंद केले पाहीजेत. मानवतेला काळिमा फासणाऱ्या कुठल्याही घटनेचे समर्थन कधीच होऊ शकत नाही, मग ती घटना कुणाही सोबत का घडली असू देत.


विरोध करायचा तर तो सर्वांसाठी करावा. यामध्ये तरी सोयीस्कर भूमिका घेऊ नये..अखलाक प्रकरणात जशी या कलाकारांनी एकजुटता दाखवली तशी या निरागस साधूंसाठीही दाखवली असली तर हा वाद उठलाच नसता.

- निहारिका पोळ सर्वटे