असं म्हणतात देव सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून त्याने आईला बनवलं. किती खरं आहे ना हे. आईशी आपण भांडतो, बोलतो, गप्पा मारतो, चिडतो सगळंच करतो. मात्र तिच्या जवळ असताना तितकंसं हे सगळं जाणवत नाही. आपल्याला हे प्रकर्शाने जाणवतं, ते तिच्या पासून थोडंसं लांब गेल्यावर. म्हणजेच आपल्या घरातून बाहेर पडल्यावर. मग ते शिक्षणाच्या निमित्ताने असू देत, नोकरीच्या निमित्ताने असू देत किंवा लग्न झाल्यानंतर. आई नावाची मात्रीण खरी उलगडते ते घरट्यातून बाहेर पडल्यावर.
आपापली कामं स्वत: करणं, भाजी आणण्यापासून ते बिल भरण्यापर्यंत, बँकेच्या कामांपासून ते अगदी अटीतटीच्या क्षणी स्वत:ला कॉन्फिडंस देण्यापर्यंत सगळंच करताना घरातून बाहेर पडल्यावर या आई नावाच्या मैत्रीणीचं महत्व अधिकच पटतं.
नीरजा चित्रपटातल्या गाण्याच्या "डाटा भी तो तूने मुझे फूलों की तरह, क्यूँ नहीं माँ सारी दुनिया तेरी तरह.." या ओळी या भावनांना खूप छान स्पष्ट करतात.
हॉस्टेल मध्ये मैत्रीणींनी दिलेला त्रास असू देत, सुरुवातीला आलेल्या अडचणी असू देत किंवा अगदी कॉलेज मध्ये मुलांनी प्रपोज करणं असू देत. या गोष्टी घरात असे पर्यंत क्वचित आईला सांगितल्या जातात, मात्र बाहेर पडल्यावर आलेल्या अनेक अनुभवांमधून जेव्हा लक्षात येतं कि जिच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो अशी एकमेव मैत्रीण म्हणजे "आई".
ऑफिस मधून घरी आल्यावर खोलीचा कारखाना झालेला बघितल्यावर घरी कानी कपाळी पसारा आवर सांगणारी आई आठवते. कारण ती कितीही ओरडली तरी आपल्या खोलीची आणि आपली काळजी घ्यायला ती आहे हे माहीतच असतं. "रात्री उशीरा झोपतेस मग सकाळी उठता उठत नाहीस तू.." हे सांगणारी आई आठवते, कारण आता हेच वाक्य ती सकाळी फोनवरून उठवताना बोलते. लिंकअप्स पासून ब्रेकअप्स पर्यंत सगळं तिला सांगता आलं तर ती तुमची खरी मैत्रीण. यासाठी तिने सतत केलेले प्रयत्न, संवाद साधण्यासाठी केलेला आटापिटा तिला तुमच्या आणखी जवळ आणतो.
लग्न ठरल्यानंतर सासरी जाण्याआधी आपल्याला तयार करणारी ही मैत्रीण फिरायला जाताना ड्रेस कुठला घेणार याविषयी पण चर्चा करते. एखादी भारी फिल्म एकत्र बघून, तिच्या कॉलेजच्या गप्पा सांगणारी ही मैत्रीण हसते ना तेव्हा खूप गोड दिसते. पुढे आपलं लग्न झाल्यानंतर अशीच एक मैत्रीण त्या घरी पण असते. दोन्ही घरातल्या या मैत्रीणींसोबत छान नातं जुळलं तरच तुम्हाला यश मिळालं असं समजा.
आई सगळ्यांना मिळते, मात्र आई नावाची मैत्रीण नशीबानं मिळते. तुम्हाला मिळाली असेल तर तिला खरंच जपा. वर्षातल्या एकाच दिवशी नाही तर दर दिवशी. कारण शेवटी सगळे परके होतात मात्र ही मैत्रीण शेवटपर्यंच हक्काने आपलीच असते. अगदी शेवट पर्यंत..... किंबहुना त्यानंतर सुद्धा.......
- निहारिका पोळ सर्वटे