पुणे जसं विद्येचे माहेरघर म्हणून प्रचिलित आहे तसंच ते महाराष्ट्राचे संस्कृतिक माहेरघर सुद्धा आहे. जितके सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात होतात तितके कार्यक्रम महाराष्ट्रात कुठेही होत नाहीत.
भारतातील अनेक दिग्गज गायक व वादक या सुरांच्या मैफिलीत येऊन रसिकांचे अखंड मनोरंजन करतात. फक्त शास्त्रीय संगीताशी मर्यादित न राहता सुफी संगीत, लोकसंगीत व अशा अनेक प्रकारांचे इथे स्वागत केले जाते. सुरांच्या प्रत्येक प्रकाराचा इथे आदर केला जातो. रंगमंच्यावर सादर करताना कुठलाही कलाकार छोटा व कुठलाही कलाकार मोठा नसतो.
ज्याला शास्त्रीय संगीताची खूप आवड नाही त्याला सवाईगंधर्व महोत्सव खूप जड जातो. जो सुरांच्या मैफिलीत नवीन आहे त्याच्यासाठी वसंतोत्सव नक्कीच सर्वोत्तम आहे. अनेक राग गाताना मध्ये मध्ये एखाद दुसरं लोकप्रिय गाणं घेऊन इथला प्रत्येक कलाकार आपल्या श्रोत्यांना या मैफिलीत सामील करून घेतो.
राहुल देशपांडे म्हणतात की फुकट हा शब्द आपण खूप चुकीच्या अर्थाने वापरतो. त्यामुळे वसंतोत्सवाची प्रवेशिका फुकट नसून "विनामूल्य" आहे. एकही रुपया न घेता रसिक प्रेक्षकांचे इतके सुंदर मनोरंजन करणारा हा कदाचित एकमेव कार्यक्रम असावा.
गेली बारा वर्ष चालत आलेली ही परंपरा पुढे अनेक वर्षे अशीच सुरू राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
जीते रहो गाते रहो !