सायबेरियन पक्ष्यांसोबत एक सकाळ..
सुंदर सकाळ (Beautiful Morning), सूर्याचा लाल गोळा गुडमॉर्निंग म्हणतोय, आणि प्रवासी पक्षी, त्यांचा आवाज.. नदीचा किनारा.. गार वारा आणि परिवार. किती रम्य दृश्य वाटतं नाही? पण हे केवळ चित्रातलं दृश्य नाही तर खरं दृश्य आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरच्या ग्वारीघाटला सकाळी सकाळी दे दृश्य दिसतं. सारबेरिया आणि यूरोपीय देशातून प्रवास करून आलेले हे पक्षी (Siberian Birds) आपल्या भेटीला येतात, आणि त्यांना नौकाविहार करत दाणा खाऊ घालणे म्हणजे एक पर्वणीच असते.
साधारणत: दिवाळई नंतर हे पक्षी इथे दिसतात. यूरोपीय देशातील वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल नसल्या कारणाने ते भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी येतात, वाराणसी, जबलपूर आणि देशातील इतर काही ठिकाणी हे पक्षी दिसतात. साधारणपणे फेब्रुवारी पर्यंत हे पक्षी इथे वास्तव्याला असतात आणि त्यानंतर ते आपल्या मायदेशी परत जातात. जबलपूर येथे नर्मदा नदी आहे. येथील अनेक घाट आणि तलावांमध्ये असलेल्या मुबलक पाण्यासोबतच येथील स्वच्छ वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल असतं. त्यामुळे ते इकडे रमतात. या काळात अनेक लोक केवळ या पक्ष्यांच्या भेटीसाठी सकाळी सकाळी (Beautiful Morning) ग्वारीघाटाकडे धाव घेतात. नर्मदेच्या पवित्र वातावरणात नौका विहार करत या पक्ष्यांची भेट घेण्याचा हा अनुभव विलक्षण असतो.
यूरोप येथील रेड ब्रेस्टेड फ्लाय कॅचर, उत्तर भारतातील ब्लॅक हेडेड बटिंग, यूरोपियन आणि हिमावयन फ्लाय कॅचर्स, टफट्रेड ग्रे ब्लॅक गूज, लाँग लेग बजार्ड आदि विविध प्रजातींचे पक्षी या काळात इथे बघायला मिळतात. सकाळच्या (Beautiful Morning) वेळी नदीवर वाफेच्या स्वरूपात तरंगणारे दव बिंदु, समोरच असलेल्या गुरुद्वाऱ्यातून येणाऱ्या पवित्र कीर्तनाचा आवाज, नर्मदा नदीच्या मध्य भागी असलेल्या माता नर्मदेच्या मंदिरातील घंटा, सूर्याचे सुरेख दर्शन आणि या पक्ष्यांचा कलरव या संपूर्ण वातावरणात मन प्रसन्न होऊन जातं.
कधी कधी आपण उगीचच शांतता आणि निसर्गाच्या शोधात फँसी जागा शोधतो. कधी कधी ही शांतता आणि निसर्ग आपल्या अवती भवतीच असते. गरज असते हा निसर्ग ही शांतता ओळखण्याची, आणि मन भरून जगण्याची.
- निहारिका पोळ सर्वटे